
राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. कमी पावसामुळे धरणे पूर्ण भरली नाही. परंतु पुणे हवामान विभागाने केलेला एक प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. ढगांवर रसायन टाकल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले आहे.
पुणे | 26 ऑक्टोंबर 2023 : यंदा पावसावर अलनिनोचा परिणाम होता. यामुळे पुरेसा पाऊस झाला नाही. सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद यावर्षी झाली. परंतु क्लाउड सीडिंगमुळे सामान्यपेक्षा 18 टक्के जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील सोलापूरमध्ये हा प्रयोग करण्यात आला. पुणे हवामानशास्त्र विभागाने केलेल्या या प्रयोगाचा संशोधन अहवाल अमेरिकन हवामान विज्ञान सोसायटीच्या बुलेटीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या प्रयोगातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्या भागांत कमी पाऊस झाला आहे, त्याठिकाणी हा प्रयोग राबवण्याची सूचना करण्यात आली होती. याला हायग्रोस्कोपिक क्लाउड सीडिंग हे नाव दिले आहे.
काय आहे हायग्रोस्कोपिंग सीडिंग?
ज्याठिकाणी तापमान शून्य अंशापेक्षा जास्त आहे, त्याठिकाणी हायग्रोस्कोपिक सीडिंगचा प्रयोग राबवण्यात येतो. या ठिकाणी ढगांवर कॅल्सियम क्लोराइडची फवारणी केली जाते. या प्रयोगाच्या प्राजेक्ट डायरेक्टर थारा प्रभाकरण यांनी सांगितले की, या प्रकल्पात ज्या ठिकाणी कॅल्सियम क्लोराइडची फवारणी करण्यात आली, त्याठिकाणी जास्त पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी सामान्यापेक्षा 18% जास्त पाऊस झाला आहे.
पाणी आणि बर्फ असलेल्या ढगांवर प्रयोग
2017-19 मध्ये बीच क्लाउड सीडिंग प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगाचा काय प्रभाव पडतो, हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी 276 ढगांचे नमूने तपासले. तसेच हा प्रयोग करण्यासाठी एक स्पेशल एयरक्राफ्टचा वापर करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी ग्लेशियोजनिक सीडिंग टेक्नीकचा वापर यासाठी केला. या तंत्रज्ञानाचा वापर ढगांच्या थंड पाण्याच्या भागावर करण्यात आला. या प्रयोगामुळे सोलापुरातील 100 वर्ग किमी भागात जास्त पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले.
देशात वापर शक्य
देशात यंदा अलनिनोचा प्रभाव पावसावर राहिला. यामुळे देशातील अनेक भागांत पुरेसा पाऊस पडला नाही. यामुळे भविष्यात ढगांवर कॅल्सियम क्लोराइडची फवारणी करण्याचे प्रयोग होण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने केलेल्या या प्रयोगाच्या अहवालाचा अभ्यास करुन यासंदर्भात निर्णय होणार आहे. परंतु हे शक्य झाल्यास देशातीस सर्व शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे.