
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धात काही लोक इस्रायलच्या सोबत आहेत तर काही लोक पॅलेस्टाईनच्या लोकांना साथ देत आहेत.
पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे, जे सध्या भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाचा भाग आहेत. विश्वचषक स्पर्धेत खेळणारे पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खान, उसामा मीर आणि मोहम्मद नवाज यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने एकजूट दाखवली आहे. तिन्ही खेळाडूंनी पॅलेस्टाईनचा ध्वज एक्सवर शेअर केला आहे.
याआधी पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धचा पाकिस्तानचा विजय गाझावासीयांना समर्पित केला होता. हा विजय गाझाच्या बंधू-भगिनींना समर्पित असल्याचे रिझवानने म्हटले होते. रिझवान (१३१) याने नाबाद शतक झळकावले. तर युवा अब्दुल्ला शफीक (११३) याने वनडेतील पहिले शतक झळकावले होते. ज्यामुळे पाकिस्तानने विश्वचषकातील सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग ४ गडी गमावून ३४५ धावांचा यशस्वी पाठलाग केला.
या विजयानंतर मोहम्मद रिझवानने एक्सवर लिहिले होते की, “हे गाझातील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. संघाच्या विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. हा विजय सोपा करून देण्याचे श्रेय संपूर्ण संघाला, विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अली यांना जाते. हैदराबादच्या लोकांचे अदभूत आदरातिथ्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’