मुंबई- मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे 38 आमदार आणि 8 खासदार आले होते. आपण काँग्रेसमध्ये जाऊ असे ते म्हणाले होते. पण मी त्यांना नाही म्हणलो. कारण मला शिवसेना पक्ष फोडून काहीही करायचे नव्हते. मला माझ्या हिंमतीवर, माझ्या ताकदीवर करायचे होते, असे विधान राज ठाकरे यांनी केले. मुंबईतील भांडूप येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव पंजाचा प्रचार करताहेत…
राज ठाकरे म्हणाले, या लोकांचे फक्त राजकीय खेळ सुरु आहेत. कारण हे लोक तुम्हाला गृहीत धरतात. कुणाला कुठला पक्ष आवडावा हा विषय नाही. पण कुठल्या पक्षाने काय करावं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची एक मुलाखत आहे. त्यात बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर शिवसेनेचे दुकान बंद करेन. आता काय दुर्दैव बघा. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि आमचे बंधू हाताच्या पंजाचा काँग्रेसचा प्रचार करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल. मी काय करुन ठेवले आणि आज त्याचे काय झाले, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
शिवसेनेतून बाहेर पडल्यावर 38 आमदार माझ्याकडे आले होते…
यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर घडलेला प्रसंगही सांगितला. मतभेद असू शकतात. सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मला काही गोष्टी पटल्या नाहीत. त्यामुळे मी शिवसना सोडली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझ्याकडे 38 आमदार आणि 8 खासदार आले होते. मला म्हणाले होते आपण काँग्रेसमध्ये जाऊ. मी त्यांना म्हटलं मुळीच नाही. मला शिवसेना पक्ष फोडून काहीही करायचे नव्हते. जर करायचे होते तर माझ्या हिंमतीवर, माझ्या ताकदीवर करायचे होते. पक्ष वगैरे फोडून काही करायचे नव्हते, असे राज ठाकरे म्हणाले.
अडचणींच्या काळात राज ठाकरे आठवतात…
आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलने तुम्ही लक्षात ठेवणार की नाही? कुणीही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक ते काम करत आहेत. जे काम करत नाहीत त्यांना तुम्ही मतदान कसे करता? ही कुठली पद्धत? सगळ्यांच्या अडचणींच्या काळात राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आठवतात. मग मतदानाच्या दिवशी काय होते? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.