८ ऑक्टोबर/नवी दिल्ली– भारतीय हवाई दिनानिमित्ताने आज भारतीय हवाई दलाला नवीन ध्वज मिळाला आहे. आज हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी या नवीन ध्वजाचे अनावरण केले. भारतीय एअर फोर्सने इंग्रजांच्या काळातील झेंड्याचा त्याग करत नव्या ध्वजामध्ये मोठा बदल केला आहे.
भारतीय हवाई दलाने एका निवेदनात माहिती दिली की, भारतीय हवाई दलाची मुल्य योग्य पद्धतीने दर्शवण्यासाठी नवीन ध्वज बनवण्यात आला आहे. तसेच ध्वजाच्या वरील डाव्या कोपऱ्यात फ्लाय साइडला हवाई दल क्रेस्ट देण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाची दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अधिकृतरित्या ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९४५ साली हवाई दलाच्या दर्जेदार कामगिरीमुळे हवाई दलाच्या नावात रॉयल शब्द जोडून सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दल हे ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये हवाई दलाने आपल्या नावातील ‘रॉयल’ हा शब्द काढून टाकला. तसेच हवाई दलाचा झेंडा देखील बदलण्यात आला.
आरआयएएफ ध्वजामध्ये वरील डाव्या कँटनमध्ये यूनियन जॅक आणि फ्लाय साइडवर आरआयएएफ राउंडेल (लाल, पांढरा आणि निळा) याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र्यानंतर भारतीय वायुसेनेचा ध्वजामध्ये खालच्या उजव्या कँटनमध्ये यूनियन जॅकची जागा भारतीय तिरंग्याने घेतली आणि आरएएफ राउंडल्सऐवजी तेथे तिरंग्याचे राउंडेल देण्यात आले.