बुजवलेला खड्डा पुन्हा उकरुन रात्री सुरु होते काम; खारघरमध्ये संशयास्पद प्रकार उघडकीस

Spread the love

जनशक्तीचा दबाव वृत्तसेवा : पनवेल : महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाइपलाइन टाकल्यानंतर बुजवलेला खड्डा पुन्हा उकरून केबल टाकण्याचा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. संशयास्पदरीत्या सुरू असलेल्या या प्रकाराची तक्रार आयुक्तांकडे केल्यानंतर हा प्रकार थांबविण्यात आला. मात्र प्रभाग कार्यालयाने याबाबत गांभिर्याने कारवाई केली नसल्यामुळे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कामाला कर्मचाऱ्यांचाच आशीर्वाद होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी आहे घटना

खारघर सेक्टर ३४, ३५मध्ये घरगुती गॅसजोडणीसाठी महानगर गॅसची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अनेक दिवसांपासून दिवसभर हे काम सुरू असते, ते सायंकाळी अंधार पडताच थांबवले जाते मात्र मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी महानगर गॅसच्या कामगारांनी वाहिनी टाकून बुजवलेला खड्डा पुन्हा उकरून त्यामध्ये केबल टाकली जात असल्याचे समोर आले. रहिवाशांना संशय आला असता, संबंधित कामगारांकडे चौकशी केली असता, व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी याच परिसरात राहणारे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील पवार यांच्याकडे तक्रार केली.

डॉ. स्वप्नील पवार यांनी महापालिकेकडे विचारणा केली असता, महानगर गॅस लिमिटेल कंपनीव्यतिरिक्त अन्य कोणालाही परवानगी दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्रभर सुरू असलेल्या कामाबाबत महापालिकेने फारसे गांभिर्य दाखविले नाही. २४ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता पुन्हा काही लोक खड्डे उकरण्यासाठी पोहचले असता, डॉ. पवार यांनी त्याची छायाचित्रे काढून प्रशासक गणेश देशमुख यांना पाठवली. त्यानंतर १२ वाजता महापालिकेने काम बंद केले, असे पवार यांनी सांगितले.

मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही महापालिकेने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन बेकायदा केबल कोण टाकत होते, कोणत्या कामाची केबल टाकली जात होती, याबाबत विचारणा करण्यासाठी प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रसिसाद मिळाला नाही

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page