सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडनं अमेरिकेचा 10 गडी राखून पराभव केलाय. या विजयासह इंग्लंड संघ टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
केन्सिंग्टन ओव्हल- ब्रिजटाऊन येथे इंग्लंड आणि अमेरिका यांच्यात झालेल्या सुपर-8 सामन्यात अमेरिकेचा 10 विकेट आणि 62 चेंडू राखून दारुण पराभव करत जोस बटलरच्या इंग्लंडनं टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकिट निश्चित केलंय. इंग्लंड टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. तर सामन्यातील पराभवामुळं प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळणाऱ्या अमेरिका संघाचा क्रिकेटच्या टी 20 विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपलाय.
बटलरची झुंजार खेळी-
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अमेरिकेला 18.5 षटकांत केवळ 115 धावांवर रोखलं. संघाकडून नितीश कुमारनं 30 आणि कोरी अँडरसननं 29 धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डननं हॅट्रिकसह 4 विकेट घेतले. त्यानंतर 116 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं एकही विकेट न गमावता केवळ 9.4 षटकांत 117 धावा करत विजय मिळवला. इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलरनं 83 धावांची खेळी करत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यानं आपल्या खेळीदरम्यान एकाच षटकात 5 षटकार ठोकले. फिल सॉल्टनं 25 धावांची नाबाद खेळी केली.
ख्रिस जॉर्डनची हॅट्रिक-
ख्रिस जॉर्डन इंग्लंडच्या शानदार विजयाचा शिल्पकार ठरला. जॉर्डन टी-20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. जॉर्डननं सामन्यात 2.5 षटकात अवघ्या 10 धावा देत 4 विकेट घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अली खान, नॉथुश केन्झिगे आणि सौरभ नेत्रावलकर यांना बाद करत जॉर्डननं हॅट्रिक घेतली. जॉर्डनला त्याच्या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द अवॉर्ड’ही देण्यात आला.
इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक: उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला 18.4 षटकांत 116 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. पण संघानं दमदार कामगिरी दाखवत एकही विकेट न गमावता 9.2 षटकांत सामना जिंकला. संघासाठी सलामीवीर फिल सॉल्ट 21 चेंडूत 25 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार जोस बटलर 38 चेंडूत 83 धावा करून नाबाद राहिला. तर अमेरिकन संघाचा एकही गोलंदाज आपली छाप टाकू शकला नाही. या विजयासह इंग्लंड संघानं 3 सामन्यात 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा नेट रन रेट 1.992 राहिला आहे. इंग्लंडनं सुपर-8 टप्प्यातील सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका यांच्यात ‘करो या मरो’चा सामना…
सुपर-8 च्या ग्रुप-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. आता दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात ‘करो या मरो’चा सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.