नागपूर: नांदेड आणि औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आता नागपुरात देखील अशीच घटना पुढे आली आहे. नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत २५ रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यातील १६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर ९ रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि , नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये १६ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यातील १२ रुग्ण हे खासगी दवाखान्यातून ऐन वेळेवर आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यांच्या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला अत्यवस्थेतील व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ आणि इतर ४ जणांना इंदिरा गांधी शासकीय महाविद्यात पाठवण्यात आले होते. खाजगी रुग्णालय रुग्णाची स्थिती बघून ऍडमिट करून घेतात तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच ऍडमिट करून घ्यावे असल्याने शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे आकडे मोठे दिसत असल्याचे रुग्णालयात प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तब्बल ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर औरंगाबाद येथील रुग्णालयात देखील २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता नागपूर येथील दोन शासकीय रुग्णालयात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा चव्हाट्यावर आली आहे. रुग्णालयात औषधे नसल्याने त्यांना बाहेर पाठवले जात असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रानाच व्हेंटीलेटरवर असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत झालेल्या या घटणांमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. या पूर्वी असाच प्रकार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडला होता. यानंतर नांदेड, औरंगाबाद येथे रुग्णांना जीव गमवावा लागल्याने राज्याच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थिती होती.