
ओडिशा- ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. तर ११०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने मृत व जखमींना मदत जाहीर केली आहे. यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनीही मोठी घोषणा केली होती, अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली होती. आता रिलायन्स समुहानेही
मोठी घोषणा केली आहे. नीता अंबानींच्या रिलायन्स फाऊंडेशनने अपघातग्रस्तांना पाठिंबा देणार असल्याची
माहिती दिली.
RIL फाउंडेशनच्या अधिकृत हँडलने ट्विटरवर म्हटले आहे की, ते बाधितांच्या उपचारांना मदत करणार आहेत आणि
त्यांची जीवनशैली पुनरुज्जीवित करण्यास मदत करणार आहेत. या दुः खाच्या प्रसंगी आम्ही पीडितांच्या पाठीशी उभे
आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो. रिलायन्स फाऊंडेशनने ट्विटर हँडलवर सांगितले की, आम्ही या अपघातात बळी पडलेल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहोत. रिलायन्स फाऊंडेशन पीडितांच्या उपचारासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. यासोबतच त्यांना समाजात पुन्हा उभे राहण्यास मदत करणार आहोत.
अदानी समुहानेही पुढं येत मदतीचे आश्वासन दिलं आहे. गौतम अदानी यांनी रविवारी ट्विट केले की, अदानी फाऊंडेशन रेल्वे अपघातात त्यांचे पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेल. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ओडिशातील रेल्वे दुर्घटना अत्यंत अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे. अदानी समूहाने सांगितले की, पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही त्यांची संयुक्त जबाबदारी आहे.