प्रकाश नाचणेकर / राजापुर- राजापूर शहरानजीकच्या शीळ येथील श्री देव ब्राम्हणदेवाच्या पालखीने शिळ गावामध्येच आदल्या रात्री गावकर मंडळींनी लपवून ठेवलेली ‘खूणा’ अवघ्या काही मिनिटांत शोधुन काढत ईश शक्तीची प्रचीती दिली. तर शिमगोत्सवाचे कार्य निर्वीघ्नपणे पार पडल्याचा एकप्रकारे दाखलाही दिला. खूणा काढण्याच्या या कार्यक्रमाला शहरासहीत परीसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
🔹️कोकणात शिमगोत्सवानंतर खूणा घालण्याची प्रथा रूढ आहे…
▪️शिमगोत्सवात देवाचे कार्य कोणतीही चूक न होता निर्विघ्नपणे पार पडले की नाही याची खुद्द ग्रामदेवतेकडुनच खातरजमा करून घेण्यासाठी खूणा घालण्याची प्रथा आहे. गेल्या अनेक पिढ्या शहरानजीकच्या शीळ गावातील नागरेकर मंडळी ही प्रथा जपत आली असून दर तीन वर्षांनी ही खुणा घालण्याची परंपरा असल्याची माहिती गावकर कृष्णा नागरेकर यांनी यावेळी दिली.
यासाठी खूणेच्या आदल्या रात्री ग्रामदेवतेचे मानकरी मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्या ठिकाणी खड्डा खेदुन खूण म्हणून त्यात नारळ आणि फुलं लपवितात आणि दुसऱया दिवशी ग्रामदेवतेची पालखी त्या ठिकाणी आणून ढोलताशाच्या गजरात नाचविली जाते. यावेळी खूणा ठेवणारे मानकरी खूणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवितात त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खूणा बिनचूक शोधुन काढते.
▪️त्याप्रमाणे शीळ येथे सोमवारी शिंपणे आणि रोमटाचा कार्यक्रम पार पडल्यावर मंगळवारी सकाळी सतीचा मळा येथे श्री ब्राम्हणदेवाची पालखी खूणा लपविलेल्या ठिकाणी वाजत गाजत आणण्यात आली.
▪️या ठिकाणी आल्यावर गावकर मंडळींनी यथासांग गाऱहाणे घातल्यानंतर सकाळी नऊ वाजता ढोल ताशाच्या गजरात पालखी नाचविण्यास सुरूवात करण्यात आली. आणि अवघ्या काही मिनिटांत पालखी खुणेचा शोध घेऊ लागली. पालखीने खुणेच्या ठिकाणी खूर मारत बैठक मारली आणि उपस्थित भाविकांनी श्री देव ब्राम्हणदेवाची जयजयकार करत एकच जल्लोष केला. मग उपस्थित ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली.
▪️खूणेची प्रथा पाहण्यासाठी शीळ तसेच राजापूर शहर, गोठणे-दोनिवडे, उन्हाळे व तालुका परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.