
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला आहे.
लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून स्पर्धेतून बाहेर काढलं आहे. यासह अंतिम फेरीत धडक मारणारा हा दुसरा संघ ठरला आहे. म्हणजेच 9 मार्चला दुबईत होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन होण्यासाठी लढत होणार आहे. लाहोर इथं 5 मार्च रोजी झालेल्या उपांत्य फेरीत कीवी संघानं प्रथम फलंदाजी करताना 363 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 गडी गमावून 312 धावाच करू शकला.
आफ्रिकेचे फलंदाज अपयशी….
लाहोरमध्ये न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरनंक्षनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांच्या संघाने 50 षटकांत 363 धावांचं डोंगरासारखं लक्ष्य ठेवलं, ज्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कीवी संघाच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून चुरशीनं गोलंदाजी करत धावा काढण्याची एकही संधी दिली नाही. त्यामुळं दडपणाखाली दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज विस्कळीत होऊ लागले. शेवटी डेव्हिड मिलरनं एकाकी झुंज देत 67 चेंडूत 100 धावा केल्या. पण त्याच्या खेळीचा काही उपयोग झाला नाही, त्याच्याशिवाय बावुमानं 71 चेंडूत 56 धावा, व्हॅन डेर ड्युसेननं 66 चेंडूत 69 धावा आणि एडन मार्करामनं 29 चेंडूत 31 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सॅंटनरनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तसंच ग्लेन फिलिप आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
कीवींची दमदार फलंदाजी….
न्यूझीलंडच्या विजयात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर शानदार फलंदाजी केली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 164 धावा जोडल्या आणि शतकही झळकावले. रचिननं 101 चेंडूत 108 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यादरम्यान त्यानं 13 चौकार आणि 2 षटकार मारले. तर विल्यमसननं 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 102 धावा तडकावल्या. हे दोघंही बाद झाल्यानंतर डॅरिल मिशेलनं 37 चेंडूत 49 धावांची तुफानी खेळी तर ग्लेन फिलिप्सनं 27 चेंडूत 49 धावांची तुफानी खेळी खेळली.