
खेड : इतर भागात प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जी धडपड दिसते, ती आपल्या भागातदेखील दिसणे गरजेचे आहे. रोटरी स्कूलने आतापर्यंत एक अधिकारी दिला आहे; परंतु आमची अपेक्षा वाढली पाहिजे. स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नाही. कोकणातून प्रशासकीय अधिकारी घडावेत, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम येथे केले.
तालुक्यातील भरणे गावातील रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये जे.ई.ई, नीट, सी.ई.टी. यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणार्या इयत्ता बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ना. कदम पुढे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी हार न मानता नव्या उमेदीने यशाच्या दिशेने मार्गक्रमण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून खेड तालुक्याची मान शैक्षणिक क्षेत्रात उंचावली आहे. हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात त्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. नकारात्मक विचार न करता सकारात्मक बनणे गरजेचे आहे. कोणताही दबाव न बाळगता यश संपादन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती न पाहता आपल्याला कोणते ध्येय गाठायचे आहे, तेथे लक्ष केंद्रित केले पाहिजे. मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीमध्ये यश लपले आहे. विद्यार्थ्यांनी पालकांसोबत त्यांना शिकवणार्या शिक्षकांचेही आभार मानले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थाचालक शिक्षक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.