
उद्धव ठाकरेंसह त्यांचं कुटुंब डेहराडूनला गेल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. छत्तीसगडला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे डेहराडूनला कशाला गेले? असा सवाल करत आदित्य ठाकरेंना अटक होणार असल्याचा दावाही नितेश राणेंनी केला आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांचं कुटुंब दुपारी 1 वाजता विशेष जेट विमानानं डेहराडूनला रवाना झाल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे दावा केलाय. काल भाजपाच्या छत्तीसगडच्या प्रचार दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. जरांगे पाटलांचे उपोषण संपेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही का?, हीच का तुमची मराठा आरक्षणाबाबत काळजी? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. आदित्य ठाकरे लवकरच देश सोडून जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे कौटुंब सहलीसाठी गेलं
नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठा आंदोलनादरम्यान पक्षाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगढ दौऱ्यावर होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावरून नितेश राणेंनी ठाकरेवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे कुटुंब काल दुपारी १ वाजता विशेष जेट विमानानं आपल्या कुटुंबातील इतर सदस्यासह, स्वयपाकीला घेऊन डेहराडूनला रवाना झाले आहेत. हीच का तुमची मराठा आरक्षणाबाबत काळजी? मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही का? असा सवाल नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेलं नव्हते, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
अटक टाळण्यासाठी देश सोडणार
आमदार आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार असल्यानं उद्धव ठाकरे बिथरले असल्याचं नितेश राणे यांनी यापूर्वीही सांगितलं आहे. आज पुन्हा एकदा नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना डिवचलं आहे. नितेश राणे म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनच्या अटकेची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस अगोदर दिशा सालियननं देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटले आहे.