नाशिक :- भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशिनमध्ये धुतले गेलेले गद्दारांचे मुख्यमंत्री डरपोक आहेत. सिनेटच्या निवडणुका देखील ते घेऊ शकत नाही. इतकी त्यांची मानसिकता खालावली आहे. क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मुंबईला व्हायची, ती देखील गुजरातमध्ये गेली. यावरून राज्य मिंधे सरकार नव्हे तर गुजरात लॉबी चालवत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
एबीएच डेव्हलपर्सच्या ट्री लॅण्ड प्रकल्पात युवकांसाठी झालेल्या कार्यक्रमानिमित्ताने ठाकरे नाशिकमध्ये आले होते, तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. सरकारवर टीका करताना ते म्हणाले, राज्यात शेतकरी, जनतेचे प्रश्न आ वासून उभे असताना सरकारमधील मंत्री पालकमंत्रीपदांवरून भांडत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत, शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली परंतु शासन आपल्या दारी जाऊनही मदत मिळत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्ष हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. राजकारणावर फक्त फोकस आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे बघण्यास वेळ नाही. सर्वत्र दादागिरी सुरु आहे.आम्ही दादागिरीचे राजकारण साफ करणार आहोत, त्यासाठी मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडियाची बैठक होत आहे. इंडियाची धास्ती केंद्रातील भाजप सरकारने घेतली आहे. वातावरण बदलत असल्याची जाणीव होत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे. म्हणूनच देशात, राज्यात दंगली घडत आहेत. महाराष्ट्रात दंगली घडविण्याऐवजी कारखाने आणले पाहिजे. आम्ही देशाच्या विकासासाठी, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्यात राजकीय भेदभाव नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार. विचार धारा वेगळ्या असल्या तरी लोकशाहीमध्ये देश विकासासाठी एकत्र यावे लागते. आमचे हिंदुत्व प्राण जाए पर वचन न जाय असे आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व आदित्य ठाकरे यांची त्र्यंबकेश्वर येथे एका रिसॉर्टमध्ये भेट झाल्याच्या चर्चेच्या अनुषंगाने ते म्हणाले,‘ मी हुडी घालून फिरणाऱ्यांपैकी नाही किंवा मला गरज नसल्याचे सांगत भेट झाल्याच्या चर्चेचा ठाकरे यांनी इन्कार केला. आता शिवसेनेत कोणासाठी दारे उघडायची व कोणासाठी बंद करायची याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. भाजपला सत्तेपासून दूर करून देश वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वसंमतीने जागांची निश्चिती होणार असल्याचे सांगताना नाशिकची जागा मात्र शिवसेना लढणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
जाहिरात