रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडवली येथील आदिती पडयार ही युवती रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली कोकणसुकन्या मेट्रो चालक ठरली आहे.
नवीमुंबई येथे सुरू झालेल्या मेट्रोच्या शुभारंभाची ट्रेन चालवण्याचा मोठा बहुमान या कोकणकन्येला मिळाला आहे. याआधीही मेट्रो चालवण्याचा मान हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील अंकिता नाईक हिच्याबरोबर अंकिता हिला मिळाला होता. दिवा येथे नोकरी व्यवसायानिमित्त गेले कित्येक वर्ष हे कुटुंब स्थायिक आहे. दिवा हायस्कूल येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इयत्ता दहावी नंतर डी. वाय. पाटील महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी डोंबिवली येथील शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयातून तीन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिककम्युनिकेशन या विषयातील डिग्री संपादन केली आहे.
त्यानंतर त्यांना मुंबई येथील मोनोरेलमध्ये ट्रेन कॅप्टन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मोनोरेलमधील दोन वर्षाच्या अनुभवानंतर आता आदिती पडयार मेट्रो चालक आहेत. नवी मुंबई येथे शुभारंभ दिवशी त्यांना २२ किलोमीटरची पॅसेंजर मेट्रो ट्रेन चालवली. आपण कधी मेट्रो ट्रेन चालवू, असं आपल्याला वाटलं नव्हतं पण मिळालेली संधी ही आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. कोकणातील मुलींनी मनात आणल्यास त्यांच्यासाठी कोणतेही अवघड क्षेत्र नाही, असा ठाम विश्वासही आदिती पडयार या युवतीने व्यक्त केला. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या कोणत्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात अशा शब्दात अदिती पडयार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकणातील सगळ्याच मुलींनी आता आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
मलाही शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. जॉबच्या संधी शोधत होते त्याचवेळी मला आधी मोनोरेल आणि आता मेट्रोमध्ये चालक या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्यामध्ये आपल्याला वडिलांचे मोठे मार्गदर्शन मिळाले. दहावीनंतर मी डिप्लोमा करावा हे मार्गदर्शन कायम मला वडिलांकडूनच मिळत आलं. आई-वडिलांचा घरच्यांचा मला मोठा पाठिंबा होता, असाही आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला.
आम्ही मुंबई महानगरात दिवा येथे राहतो. एकत्रित कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालो आहोत. आदिती यांची आई गृहिणी आहे तर वडील खाजगी नोकरी करतात. मला मेट्रो चालवण्याची संधी मिळाल्यानंतर मला कोकणातून गावावरून अभिनंदन व कौतुकाचे कॉल येत आहेत. याचे समाधान खूप मोठे आहे अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. मला भविष्यात अशा आव्हानात्मक संधी मिळाल्या तर नक्कीच मी त्याचा उपयोग करेन, असाही आत्मविश्वास आदिती पडयार यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील मेट्रो चालक पदावर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आदिती पडयार यांचे सामाजिक शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आलं आहे.