मुलाच्या लग्नात अदानींनी दान केले १० हजार कोटी…

Spread the love

अहमदाबाद :  आपल्या मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे केला जाईल असे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी महा कुंभमेळ्यात जाहीर केले होते. मुलाचे लग्न साधेपणे होईल असे जाहीर केल्याने हा विवाह भपकेबाज आणि खर्चिक पद्धतीने होईल या अफवांनाही त्यांनी पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आता शब्दाला जागून गौतम अदानी यांनी या विवाहानिमित्त दहा हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे जाहीर केले. जीत गौतम अदानी याच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाणार आहे.
     

गौतम अदानी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होणार आहे. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडण्याजोग्या दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील पण उच्च दर्जाच्या के ट्वेल्व्ह शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे.
      
मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा विवाह आज नातलग आणि परिचित यांच्या उपस्थितीत पारंपारिक रीतीरिवाज आणि ज्येष्ठांच्या शुभ आशीर्वादात झाला. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. पुत्री दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे, असं गौतम अदानी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
     

या पोस्टमध्ये गौतम अदानी यांनी त्यांची सून दिवा यांचाही उल्लेख मुलगी असा केला. अहमदाबाद मधील अदानी शांतीग्राम वसाहतीमधील बेलवेदर क्लबमध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह सोहळा पार पडला. दिवा ही विख्यात हिरे व्यापारी जैमिन शहा याची कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला. त्याला फक्त जवळचे नातलग आणि मित्र अशा मोजक्या मंडळींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या विवाहास बडे राजकारणी, परदेशी मुत्सद्दी, उद्योजक, सनदी अधिकारी, चित्रपट तारे तारका, करमणूक करणारे व्यावसायिक आणि अन्य सेलिब्रिटी उपस्थित नव्हते.
      

या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदानी यांनी यानिमित्त मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला होता. याद्वारे ५०० विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य पुरवले जाणार आहे. दरवर्षी एवढेच सहाय्य दिले जाणार असून विवाहाच्या निमित्ताने जीत याने या उपक्रमाची सुरुवात करताना २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांना सहाय्य दिले.
    

जीत आणि दिवा यांनी विवाहानिमित्त समाजसेवी उपक्रमांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात केली, याबद्दल गौतम अदाणी यांनी समाधान व्यक्त केले होते. गौतम अदाणी प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात २१ जानेवारी रोजी सहभागी झाले होते. तेव्हा, त्यांना विवाहानिमित्त सेलिब्रिटींचा महा कुंभमेळा जमेल का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर गौतम अदानी याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता.
     

आम्ही सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहोत. जीत येथे फक्त गंगामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आला आहे. त्याचा विवाह परंपरागत पद्धतीने साधेपणानेच होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्यानुसार हा विवाह साधेपणाने झाला. समाजसेवेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षणही कसे साजरे करावेत, हे गौतम अदानी यांनी दाखवून दिले आहे. संपत्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी त्यांनी विचारपूर्वक समाजसेवेवर भर देऊन आदर्श निर्माण केल्याचे म्हटलं जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page