गणपतीपुळे/ जनशक्तीचा दबाव प्रतिनिधी- गणपतीपुळे मधील समुद्रकिनारी व इतर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसाय धारकांना 23 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच , उपसरपंच ,सदस्य व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त असलेले व्यवसाय, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी जादा कामगार असलेले व्यावसायिक; ग्रामपंचायतीचा व्यवसाय कर थकविणारे, फ्री झोनचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिक यांच्यावर ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार सदरचे कारवाई दरम्यान संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असून यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसा किंवा रात्री केव्हाही कारवाई करण्यात येईल , अशा प्रकारची जाहीर नोटीस समुद्रकिनारी स्थानिक ग्रामपंचायतीने लावली आहे.
त्यामुळे समुद्रकिनारी व इतर सार्वजनिक ठिकाणच्या सर्वच अनधिकृत व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या एक-दोन वर्षापासून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सर्वच व्यवसायांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. याठिकाणी परप्रांतीय कामगारांचे प्रमाण ही वाढल्याने स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. या ठिकाणी वाढलेले अतिक्रमण कमी व्हावे या उद्देशाने गणपतीपुळे येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीला वारंवार कळविले होते मात्र याबाबत कुठलीही कारवाई झालेली नव्हती .
गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा गणपतीपुळे येथील प्रमुख ग्रामस्थांनी एकत्रित येऊन समुद्र किनाऱ्यावर वाढलेले अतिक्रमण कमी करावे,
यासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये संबंधित ग्रामस्थांनी लावून धरलेल्या मागणीचा विचार करून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने २३ नोव्हेंबर रोजी समुद्रकिनारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून संबंधित अतिक्रमण असलेल्या व्यवसायिकाना सूचना दिल्या आहेत.त्यामुळे याबाबत आता नक्की ठोस कारवाई कधी होणार, याकडे स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.