
मुंबई :- एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी प्रवासात नाश्ता, चहा, जेवणासह, स्वच्छतागृहाची सोय व्हावी यासाठी मार्गावरील हॉटेलच्या ठिकाणी अधिकृत थांबे देण्यात आले आहेत . त्याठिकाणी हॉटेलमध्ये प्रवाशांना तिकीट दाखवल्यास त्यांना सवलतीच्या दरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय केली जाते, उन्हाळी हंगामात प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे यातून हॉटेल मालकांना सुद्धा चांगली रग्गड कमाई होते. मात्र, हॉटेल मालकांकडून ३० रूपयांमध्ये ठरल्याप्रमाणे नाश्ता दिला जात नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे केल्याने आता अशा हॉटेल चालकांवर कारवाईचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत .
एसटी महामंडळाच्या खाजगी थांब्यांवरील हॉटेल मालकाने ३० रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉटेल चालक या आदेशाचे पालन करीत नसून, दर्शनीय जागेवर त्यासंबंधीत माहितीचे फलक सुद्धा लावल्या जात नाही. परिणामी एसटीच्या प्रवाशांना या सुविधाच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने मार्ग तपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक आणि विभागातील अधिकाऱ्यांनी ३० रुपयातील नाश्ता दिला जात आहे का ? आणि जादा दराने नाथजल विक्री होत असेल तर खातरजमा करावी. तसेच योजनेची अंमलबजावणी होत नसेल तर हॉटेल मालकाच्या ही बाब निर्दशनास आणून द्यावी. तसेच अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा. तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी दिले आहेत .