मुंबई : नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून बुधवारी एका रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली. हृदयरोग विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. अविनाश सावंत (४०) असे मृताचे नाव आहे. अविनाश हा सिंधुदुर्गातील पंचशील नगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रुग्णाला १ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर ८ मार्च रोजी त्यांना हृदयरोग विभागात हलवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश सावंत यांच्या अँजिओग्राफी रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. काही उपचारानंतर सावंत यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. मात्र, सकाळच्या सुमारास त्यांनी शौचालयात जाऊन खिडकी उघडली व तेथील कर्मचाऱ्यांना कळण्याआधीच सावंत यांनी उडी मारली.
सावंत यांनी उचललेल्या या पाऊलामुळे त्यांचे कुटुंबीय आणि हॉस्पिटल प्रशासनाला धक्का बसला आहे. सावंत काही वैयक्तिक समस्येने झगडत होते. तसेच सततच्या आजारपणामुळे ते नैराश्यात असायचे. या कारणांमुळे त्याने टोकाचे पाऊल उचललं असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.