
गुहागर : शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात अपघातग्रस्त दुचाकी व बेशुध्द पडलेले दोन तरुण ग्रामस्थांना दिसले. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचल्यावर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी दोघांना आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी दोघांपैकी एका तरुणांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
बेशुध्द असलेला दुसरा तरुण उपचारादरम्यान शुध्दीवर आल्यावर मृताची ओळख पटविण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिपळूण तालुक्यातील कादवड
गावातील शैलेश सुनिल जाधव (वय २०) आणि रोहीत दीपक निकम (वय १९) हे दोन तरुण शुक्रवारी पहाटे ४ वाजता दुचाकीने (एमएच ०८ यू २३५६) तवसाळकडे निघाले होते. तवसाळला आंबा काढणीचे कामासाठी चालले होते. सकाळी ६च्या सुमारास ते शीर येथे आले. खालची शीर येते आबलोली रस्त्यावर एक तीव्र वळण आहे. या वळणात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात शिरले. तेथे काजूच्या झाडाची एक फांदी आडवी आली होती. दोघेही या फांदीवर आपटून बेशुध्द पडले.