बीड- बीडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मोठी घटना घडली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री दत्ता भरणे यांचा ताफा अडवून तरूणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेप्रकरणी पोलिस तरुणाची चौकशी करण्यात येत आहे.
बीड नगरपालिकेच्या अंतर्गत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा. मुख्याधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा या मागणीसाठी एक तरुण चांगलाच आक्रमक झाला होता. नितीन मुजमुले नावाच्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला आडवे जात नितीन मुजमुले नावाच्या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
बीडमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावरील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार संदिप क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश पाठक , पोलीस अधीक्षक नवनीत कावत,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असल्याची ग्वाही देत शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे भरणे म्हणाले.