
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते भोके रेल्वेस्टेशनच्या दरम्यान पटना सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. जयश्री जयवंत शिंदे असे रेल्वेची धडक बसून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रेल्वे पोलीस कर्मचारी अनंत तुकाराम सुवारे (५६, मूळ रा. कुरचुंब, पो. आडवली, लांजा) यांनी याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते कामावर कार्यरत असताना त्यांना २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता पटना सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या टीसीने एक महिला रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते भोके रेल्वेस्टेशनच्या दरम्यान रेल्वेची धडक बसून जखमी झाल्याची माहिती दिली. रेल्वे पोलीस कर्मचारी अनंत सुवारे यांनी ही माहिती रत्नागिरी स्टेशनमास्तरांना दिल्यानंतर त्या जखमी महिलेला गाडीने रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आणून तेथून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वाजताच्या सुमारास जयश्री शिंदे यांना तपासून मृत घोषित केले. या महिलेकडे तिचे आधार कार्ड मिळाले असून त्यावरुन तिची ओळख पटली.