डोंबिवली – आपण मला विकलेले घर बेकायदा इमारतीमधील आहे. त्यामुळे आपण माझी फसवणूक केली आहे. घरासाठी घेतलेले पैसे परत करा, असा तगादा बेकायदा इमारत उभारणाऱ्या विकासकाकडे लावणारी एक महिला आणि तिच्या मुलाला बुधवारी विकासक आणि त्याच्या मुलाने बेदम मारहाण केली.
विकासक बाळू भोईर आणि त्याचा मुलगा अनिकेत भोईर अशी गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची नावे आहेत. मारहाण झालेल्या महिलेने बाळू भोईर याच्याकडून एक इमारतीत घर खरेदी केले होते. आपण राहत असलेली इमारत बेकायदा आहे याची माहिती मिळाल्यावर घर खरेदीदार महिलेने विकासक बाळू याच्याकडे घराचे भरणा केलेले पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावला होता. तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता.
बेकायदा इमारतीत घर असल्याने त्याच्यावर पालिकेकडून कोणत्याही वेळी कारवाई होऊ शकते अशी भीती महिलेला होती. बुधवारी त्या आपल्या मुलाबरोबर बाळू भोईर याच्याकडे घराचे पैसे परत मागण्यासाठी गेल्या. त्यावेळी बाळू भोईर याच्याबरोबर त्यांचा वाद झाला. तसेच महिलेच्या घरावर बाळू याच्या मुलाच्या नावाची पट्टी असल्याचे दिसून आले. ही नावपट्टी कोणी लावली असा प्रश्न महिलेला विकासक बाळू यांना केला. त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण होऊन बाळू आणि त्याचा मुलगा अनिकेत याने महिला आणि तिच्या मुलाला मारहाण केली. त्यांच्या वाहनाची मोडतोड केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.