रत्नागिरी- समाजातून बालविवाह सारख्या अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी सांगितले. नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयात ‘ॲक्सेस टू जस्टीस’ बालविवाह मुक्त भारत अभियान राबविला जात आहे. या मोहिमेचे उद्घाटन श्रीमती घाणेकर आणि महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी मशाल पेटवून जिल्हा परिषदेत केले.
यावेळी जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रिया लोवलेकर, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी समृध्दी वीर, समन्वयक सुकन्या ओळकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्रीमती घाणेकर म्हणाल्या, ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात बाल विवाह केले जातात. त्यामुळे या भागात त्यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि या अनिष्ठ रुढीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे.
जिल्हा बालकल्याण समिती सदस्य श्रीमती लोवलेकर म्हणाल्या, समाजातील अनिष्ठ रुढींविरोधात आपण लढणे गरजेचे आहे. 2006 हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा सर्वांपर्यंत पोहचविणे फार महत्वाचे आहे. नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट रायगड यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ‘ॲक्सेस टू जस्टीस’ बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी बालविवाह मुक्त भारत बाबतचे पथनाट्ये सादर केले. भूवन रिभू यांनी लिहिलेल्या व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन हे पुस्तक मान्यवरांना देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी बालविवाह मुक्त भारत ची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री. लिंगायत यांनी केले.