नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर इको गाडीची रिक्षाला धडक ,पाच प्रवासी जखमी..
नेरळ: सुमित क्षीरसागर ,
गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी सर्वत्र धावपळ सुरू आहे.त्यात नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षाला इको कार ने धडक दिल्याची घटना 21 सप्टेंबर रोजी घडली.या अपघातात रिक्षा मधील चार प्रवासी आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले असून नेरळ पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान,या अपघातात एक अडीच वर्षाची मुलगी रुग्णालयात उपचार घेताना मयत झाली असून आणखी एक लहान मुलगा अत्यवस्थ आहे.
दामत येथील रिक्षाचालक नदीम मुश्ताक नजे हे आपली प्रवासी रिक्षा घेवून 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता नेरळ कडे येत होते.त्यावेळी सौशल्या अपार्टमेंट समोर मूळचे मुंबई बांद्रा येथील एक महिला आपल्या दोन मुलांसह रस्त्याच्या कडेला प्रवासी रिक्षाची पकडण्यासाठी नेरळ बाजूच्या रस्त्याला येत होत्या. त्यावेळी प्रवासी येत असल्याचे पाहून रिक्षाचालक नदीम नजे यांनी आपली प्रवासी रिक्षा क्रमांक एम एच बीपी 4037 ही रिक्षा कल्याण नेरळ रस्त्याच्या कडेला उभी केली.प्रवासी रिक्षामध्ये बसण्यासाठी येत असताना नेरळ गावाकडून बदलापूर कडे जाणाऱ्या एम एच 14 सी एक्स 4081 या इको कार ने आधी त्या महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलांना धडक दिली.नंतर पाठीमागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला देखील धडक देवून अपघात केला.
त्यावेळी अतिवेगाने इको कार चालक नेरळ कडून येत असल्याने हा मोठा अपघात घडला असून रिक्षामध्ये दामत येथून प्रवास करणारे बाबू भाईजी यांचे डोक्याला तसेच कमरेला तसेच रिक्षा चालक नदीम नजे आणि महिला तसेच दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमी प्रवासी यांना तातडीने बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बदलापूर येथे उपचार घेत असताना गंभीर जखमी असलेल्या अडीच वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर जखमी मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथून मुंबई येथे नेण्यात आले आहे. मुंबई बांद्रा येथील त्या कुटुंबाचा सोशल्या इमारतीत सदनिका असून सुट्टी साठी नेरळ ममदापूर येथे आले होते आणि मुंबई येथे परत जाण्यासाठी ते निघाले होते.या अपघातास कारणीभूत असलेले इको कार चालक याच्यावर नेरळ पोलीस ठाणे येथे अपघात गुन्हा दाखल झाला आहे.
भादवी कलम 279,337,338 आणि मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल आहे.पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असून हवालदार राहुल गायकवाड अधिक तपास करीत आहेत.या अपघातात लहान मुलगी मयत झाली असून त्याबाबतची माहिती बदलापूर पोलीस ठाणे येथून नेरळ पोलीस ठाणे यांना प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद 267/2023 या गुन्ह्यात होईल आणि नंतर भादवी कलम देखील वाढतील.