गुहागर : सायंकाळी फिरायला जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पलायन करणार्या गुहागर तालुक्यातील नरवण येथील चोरट्याला गुहागर पोलिसांनी अवघ्या दोन तासात गजाआड केले. ही चोरीची घटना शनिवारी सायंकाळी जामसूत येथे घडली होती.
जामसूत दत्तवाडी येथील प्रेमलता साळवी (७०) ही वृद्ध महिला सायंकाळी ५ वा. जामसूत पेप्याजवळ बोर्या रस्त्यावर फिरत होती. दरम्यान रस्त्याने जाणार्या एका दुचाकीस्वाराने साळवी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पलायन केले.
या चोरीची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात तत्काळ देण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जामसूत व पिंपर गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व ग्रामस्थांकडून माहिती घेवून जलदगतीने तपास सुरू केला. सीसीटीव्हीत दिसणारा चोर काळ्या रंगाची गाडी, तोंडाला मास्क व टोपी घातलेला आढळला. कसून चौकशी करत माळ खेचणारा चोरटा नरवण पंधरवणे येथून ताब्यात घेण्यात आला. प्रशांत नंदकुमार पाटेकर (३४) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. या चोरट्यावर भा.दं.वि.क. ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली आहे.