*सांगली-* नाताळच्या सुट्टीसाठी गावी येत असलेल्या सांगलीतील एका कुटूंबावर काळाने घाला घातला. कर्नाटक राज्यातील नेलमंगळा येथे बंगळूरू महामार्गावर आज शनिवारी एक कंटेनर ट्रक कारवर पलटल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सांगली जिल्ह्यातील जतमधील असल्याचे माहिती आहे. या घटनेने जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सांगलीमधील जत तालुक्यातील मोरबगी गावातील लोक बेंगळूरुला कामाला आहेत. नाताळच्या सुट्टीनिमित्त बेंगळुरूवरून आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. कारमध्ये ६ जण होते ते जतमधील आपल्या गावाकडे येत होते. मात्र गावी पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. तळकेरे येथे आल्यानंतर समोरून येणारा कंटेनर ट्रक कारवर पलटी झाला. या घटनेत कारमधील सर्व जणांचा मृत्यू झाला. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे.
बंगलोर जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस निमित्त सुट्टी असल्याने हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवली.