
*मुंबई-* राज्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाचे सावट राज्यावर असले तरी हवामान अंदाजानुसार पाऊस होणार नाही परंतु राज्यात ढगाळ वातावरण काही दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान आहे. याचा परिणाम थंडीवर झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात आज चांगलीच वाढ झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरणात गुरुवारी सायंकाळपासून बदल होऊ लागला असून, धुक्यापाठोपाठ ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. गेल्या काही चार-पाच वर्षांनंतर जिल्ह्यात थंडीचे वास्तव्य महिना ते दीड महिना राहिले आहे. जिल्ह्यातील फळ पिकांना आवश्यक अशा नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये थंडी स्थिरावल्याने आंबा, काजूसह सर्वच फळपिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
आंबा, काजूला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. किनारपट्टी भागात पानापेक्षा मोहोर अधिक अशी स्थिती आंबा बागांमध्ये असल्याचे चित्र आहे, तर काजू पिकालादेखील अनेक वर्षांनंतर चांगला मोहोर आला आहे. एकीकडे चांगला मोहोर आणि दुसरीकडे किडरोगांचा प्रादुर्भावदेखील कमी राहिला. त्यामुळे यावर्षी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे; परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात धुक्याचे प्रमाण वाढले. पहाटेच्या वेळी पावसाप्रमाणे झाडांवर पाणी पडत होते. त्यामुळे ‘टी मॉस्किटो’ आणि बुरशींचे प्रमाण वाढण्याची शक्यता होती. त्यातच गुरुवार सायंकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासूनदेखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे गेले महिनाभर सुरू असलेली थंडी काहीशी कमी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी अचानक पाऊस झाला. त्यानंतर सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे वातावरणदेखील काही भागात होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*