जनशक्तीचा दबाव न्यूज | पालघर | फेब्रुवारी ०१, २०२३.
मुंबईजवळील पालघरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानमाता आदिवासी महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील आदिवासी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने बाथरूम मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अॅलेस विनय लखन असं या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे.
अॅलेस लखन हा तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा येथील मूळचा रहिवासी होता. अँलेस हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ॲलेसला बाथरूममध्ये लटकलेले पाहताच वस्तीगृह व्यवस्थापन आणि वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यावेळी त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं.
“ॲलेस डेथ आणि व्हॉट आय डू?” असं मृत अँलेसच्या हातावर लिहिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात केली. मात्र या सगळ्या घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.