
नेरळ : सुमित क्षीरसागर
माथेरान येथून नेरळ हुतात्मा चौकातून कर्जत कडे जाणाऱ्या खासगी प्रवासी गाडीला एक तीन चाकी रिक्षा धडकली. मात्र प्रवासी कार हि धीम्या गतीने पुढे जात होती, त्यामुळे तीन चाकी रिक्षा मधील प्रवासी यांनी किरकोळ जखम झाल्याने मोठा अपघात टळला आहे.दरम्यान, हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी नेरळ टॅक्सी संघटना आणि हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे गेली अनेक वर्षे करीत आहेत.
माथेरान येथे सध्या पर्यटक हंगाम असून तेथे मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन येत असतात.त्या वाहनांची ये जा हुतात्मा चौकातून होत असते.आज ४ मे रोजी सकाळी माथेरान येथून एक प्रवासी कार मुंबई कडे जाण्यासाठी निघाली होती.हुतात्मा चौकातुन हि कार मुंबई कडे जाणयासाठी कर्जत दिशेने वळत असताना कर्जत कडून एक तीन चाकी रिक्षा वेगाने येत होती.त्यावेळी माथेरान कडून येणारी कार आणि कर्जत कडून नेरळ गावाकडे आलेली रिक्षा यांची धडक झाली. त्यानंतर हि रिक्षा एका बाजूने कलंडली आणि ती साधारण २० मीटर घरंगळत जात असताना माथेरान येथून येणाऱ्या आणखी एका कार समोर आदळणार अशी स्थिती त्यावेळी होती.या अपघातात रिक्षा मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेतले.
मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने मोठा अपघात होता होता टळला आहे.तेथील हुतात्मा चौकात गतिरोधक असावा अशी मागणी हुतात्मा स्मारक समिती कडून अनेक वर्षे केली जात आहे. त्याचवेळी नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने देखील त्या भागात गतिरोधक बनविले जावेत अशी मागणी केली आहे.अपघाताची माहिती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी लवकरात लवकर त्या भागात गतिरोधक बनविले जाईल असे आश्वासन दिले आहे.