
कर्जत- सुमित क्षीरसागर
जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ तर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज सकल मराठा समाजाकडून कर्जत तालुका बंदची हाक देण्यात आली होती.दरम्यान या हाकेला विविधसंघटनांनी पाठिंबा देत तालुका बंदला उत्स्फूर्तपणे साथ दिली.त्यामुळे आज शहरात-गावात आणि पाड्यावर व्यापार थांबला होता.”कोण म्हणतं देणार नाही.घेतल्या शिवाय राहणार नाही” एक मराठा लाख मराठा असे म्हणत तालुक्यात सकल मराठा समाजाचा आवाज घुमत होता.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मागील १३ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांवर काही दिवसांपूर्वी पोलिसकडून लाठीचार्ज करण्यात आला होता.या लाठीचार्जचे राज्यभर पडसाद उमटले असून याचे लोन गावपातळीवर येवून पोहचले होते.आज कर्जत सकल मराठा समाजाकडून निषेध मोर्चा सह मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज रस्त्यावर उतरला होता.कर्जत,नेरळ,डिक्सल,कडाव,कशेळे यांसह तालुक्यातील ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आले होते.

कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलीस देखील आंदोलन ठिकाणी उपस्थित होते.सकल मराठा समाजाने पुकारलेल्या या आंदोलनाला तालुक्यातील RPI आठवले गट,वंचित बहुजन आघाडी, आदिवासी-ठाकूर समाज तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पाठिंबा दर्शवित आंदोलनात सहभागी झाले होते.नेरळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून ,सकल मराठा समाजाकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर तर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील,भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यात आले.शांततेत काढण्यात आलेल्या या आंदोलनाला येथील व्यापारी वेल्फेअर असोसिएशन संघटना,रिक्षा चालक मालक संघटना यांनी ही पाठींबा दर्शविला होता.कर्जत शहर येथे टिळक चौकात सकल मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली होती.यावेळी कोण म्हणतं देणार नाही.

घेतल्या शिवाय राहणार नाही” एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमचे हक्काचे अशा घोषणांनी आज शहर दणाणून सोडले होते.दरम्यान येथे शिवशाहीर गणेश ताम्हाणे यांनी पोवाडा गायला.या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठींबा तसेच लहान चिमुकल्या पासून महिला वर्गाने आपली उपस्थिती लावली होती.राज्य सरकारवर यावेळी आंदोलन कर्त्यांनी सडकून टीका करीत निषेध नोंदविला तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे सुरू असलेले उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज समाज रस्त्यावर उतरला असल्याचे सांगत यापुढे मोठे आंदोलन राज्यात छेडले जाईल असेही सांगण्यात आलं.