मुंबई- चीनमधून मुंबईमधील न्हावा शेवा बंदरावर आलेल्या एका जहाजाला भारतीय सुरक्षा दलाने अडवलं आहे. जहाजात असलेलं साहित्याचा उपयोग पाकिस्तान क्षेपणास्त्र बनवण्यासाठी करेल असा संशय व्यक्त केला जात आहे. गृप्तहेरांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना या जहाजाविषयीची माहिती दिली होती. CMA-CGMहे जहाज चीनहून पाकिस्तानात जात होते.
भारतीय सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जहाजाला अडवल्यानंतर त्यावर लादलेल्या वस्तूंची तपासणी केली. या जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते. डीआरडीओच्या टीमद्वारेही जहाजावरील वस्तूंची तपासणी करण्यात आली. या सीएनसी मशीनचा उपयोग पाकिस्तान क्षेपणास्त्र करण्यासाठी करेल असा शंका व्यक्त करण्यात येत आहे. चीनमधून कराचीला जाणाऱ्या या जहाजाची माहिती गृप्तहेरांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली होती.
त्यानंतर भारतीय सुरक्षा रक्षक सतर्क झाले आणि त्यांनी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात या जहाजाला अडवलं. दरम्यान भारतीय सुरक्षा दलाने याविषयी माहिती ट्विट करत दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल ऑफ लॅडिंग आणि इतर कागदपत्रांनुसार, जहाजावरील वस्तू शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेडमधून लादण्यात आल्या होत्या. या वस्तू सियालकोट येथील पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड येथे पोहोचवल्या जाणार आहेत.
दरम्यान या जहाजावर मिळालेल्या सीएनसी मशीन इटालियन कंपनीकडून तयार केल्या जातात. हे मशीन कॉम्प्यूटरद्वारे नियंत्रित केली जाते. या मशीनद्वारे कार्यक्षमता, सातत्य आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सीएनसी मशीन्स १९९६ च्या वासेनार यांच्या करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हा करार एक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणाली आहे. भारत हा या करारातील ४२ सदस्य देशांपैकी एक आहे. हे देश त्यांच्या पारंपरिक शस्त्रे, आण्विक कार्यक्रम इत्यादींशी संबंधित माहिती आणि माहितीची देवाणघेवाण करतात. उत्तर कोरियाने सीएनसी मशीनचा वापर अणू शस्त्रास्त्रे करण्यासाठी केला होता.