
योगेश बांडागळे/चिपळूण: चिपळूण नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच शहरात ‘बिर्याणीचा बाफ’ उठलेला आहे. पक्ष कोणताही असो, इच्छुकांनी सध्या आखाडी पार्ट्यांच्या फडात झेंडा फडकवायला सुरुवात केली आहे. निवडणुकीचं औचित्य साधून कोणी महाबळेश्वरची थंडी निवडली आहे, कोणी कोयनानगरचं हिरवंगार वातावरण… तर कोणी चिपळूणच्या हॉटेलांमध्येच रस्सेदार आखाडी रंगवली आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांत चिपळूणमध्ये जेवढ्या ‘आखाडी पार्टी’ झाल्या, तेवढे शाळेत डब्बे कदाचित वर्षभरात उघडले जात नसतील. महत्त्वाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नेते, वॉर्डप्रमुख यांचं ‘मन राखणं’ म्हणजे निवडणूकपूर्व ‘स्नॅक्स पॉलिटिक्स’!
नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे. अगदी इतकी की ती छापून दिली, तर वृत्तपत्राला पुरवणी काढावी लागेल. पुरुषांची गर्दी तर आहेच, पण काही महत्त्वाकांक्षी महिलादेखील यंदा मैदानात उतरायची तयारी करत आहेत.
या सगळ्यात आरक्षण कोणत्या वॉर्डात, कोणत्या लिंगासाठी लागणार, हेच खऱ्या अर्थाने लावणार आहे. त्यामुळे अनेकजण ‘जाईल तिथे उभं राहू’च्या धोरणावर आहेत. काहींनी तर निधड्या छातीने जाहीर केलं, “पाच कोटींचं बजेट ठेवलंय… जेवण, जाहिरात आणि प्रचारासाठी!”
दरम्यान, एका राजकीय नेत्याचा वाढदिवस अगदी थाटात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. “यंदाचा वाढदिवस म्हणजे निवडणूकपूर्व शक्तिप्रदर्शन!” असंच सगळे म्हणतायत. मोठ्ठं बॅनर, बँडपथक, आकाशफुगे आणि प्लेटभर बिर्याणीचीही तयारी!
चर्चा आहे ती आता कामाची नव्हे, तर किती बिर्याणी खपली, कोणत्या हॉटेलात किती वडे संपले, कुणी कुठल्या ब्रँडच्या बाटल्या दिल्या याची. सोशल मीडियावर तर फोटोबाजी सुरूच आहे. “हा फोटो महाबळेश्वरचा, हा या हॉटेलचा आणि हा स्नेहभोजन कोयनानगरचा!”
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर