मुंबई 7 मे 2023- वीर सावरकरांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले माहिममधील पुरातन मंदिर पाडण्याचा डाव
माहिम येथील कटारिया मार्गावर १९३३ साली बांधण्यात आलेले दत्त मंदिर तोडण्याचा डाव आखला जात आहे. या कारस्थानाला मंदिर बचाव समितीने विरोध केला आहे. १९३३ साली उद्योगपती दानवीर भागोजी कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संकल्पनेतून माहिम येथे हे दत्त मंदिर बांधण्यात आले.
मंदिर बचाव समितीचे सदस्य प्रशांत पल, कल्पेश वराडकर, राजू चौबे, राज दुदवडकर, नितिन येंडे, भास्कर देवडीगा या सदस्यांनी सांगितले की, ‘श्री दत्त मंदिरचे विश्वस्त भागोजी कीर यांचे नातू अकुंर कीर यांनी जेव्हापासून मंदिराच्या विश्वस्त मंडळात शेट्टी कुटुंबाला घेतले आहे, तेव्हापासून मंदिरावर कब्जा (ताबा) करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या मंदिराच्या जवळ शेट्टी कुटुंबाचे एक हॉटेल आहे, ज्याच्या विस्तारीकरणात मंदिराची जागाही समाविष्ट केली जात आहे.
या सदस्यांनी सांगितले की, मंदिराच्या तिसऱ्या पिढीच्या पुजारींना धार्मिक उत्सवादरम्यान होणाऱ्या पालखी प्रदक्षिणेवर बंदी घातली आहे. शिवाय महिलांसाठी बांधलेले शौचालय देखील तोडले गेले आहे.
शिवसेनेने घेतला होता पुढाकार
महानगरपालिकेकडून डिसेंबर २०२०मध्ये दत्त मंदिर तोडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. मंदिर इमारतीला सी-१ श्रेणीत ठेवले होते. परंतु हे मंदिर पुरातन असल्यामुळे खूप मजबूत आहे. त्यामुळे हे मंदिर वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर शिवसैनिकांना घेऊन घटनास्थळी पोहोचले होते आणि हे पुरातन मंदिर तोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते.