बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) २०२४-२५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. आज (१५ डिसेंबर) या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकं झळकावत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले.
ब्रिस्बेनमधील गाबा- पण टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने ५ विकेट घेतले. बुमराहला भारताच्या इतर गोलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात ५ बळी घेत वन मॅन आर्मी असल्याचे सिद्ध केले.
बुमराहने नव्या चेंडूने ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. त्याला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ मिळाली नाही आणि संपूर्ण सामन्यात तो एकटाच लढत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने भारतावर वर्चस्व गाजवले. मात्र, बुमराहने या दोघांचीही तंबूत पाठवून मोठा अडथळा दूर केला.
या सामन्यात जेव्हा-जेव्हा नवीन चेंडू हातात आला तेव्हा बुमराहने विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला. शनिवारी पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
मात्र, दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ झाला आणि बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना नव्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने उस्मान ख्वाजाला आधी बाद केले. १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्वाजा यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. त्यानंतर त्याने नॅथन मॅकस्वॅनीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहलीने त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले.
स्मिथ आणि हेडने भारताला खूप त्रास दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २४१नधावांची भागीदारी केली. बुमराहने पुन्हा ही भागीदारी तोडली. भारताने नवा चेंडू घेताच बुमराह वरचढ झाला. शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच स्मिथ बुमराहच्या चेंडूवर स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेलबाद झाला. यानंतर बुमराहने हेडलाही आपला शिकार बनवले. स्मिथने १०१ आणि हेडने १५२ धावा केल्या.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा ५ बळी घेण्याच्या बाबतीत बुमराह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. WTC मध्ये बुमराहचे हे नवव्यांदा ५ बळी घेतले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनेही या चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ९ वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
आता बुमराह आणि कमिन्स यांच्यात एक नवीन लढाई सुरू झाली आहे आणि ही लढाई कसोटी चॅम्पियनशिपमध्ये जास्तीत जास्त ५ बळी मिळवण्यासाठी आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ७ वेळा ५ किंवा त्याहून अधिक बळी घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराहची कसोटी कारकिर्दीक पाच विकेट्स घेण्याची ही १२वी वेळ आहे.