नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Spread the love

▪️माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा

▪️ताराक्कासह ११ जहाल नक्षलवादी शरण..

▪️स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु

▪️लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, ६ हजार २०० कोटींची गुंतवणूक, ९ हजार रोजगार

▪️कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान

▪️गडचिरोलीपासून २०० कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद

▪️सी- ६० जवानांचाही सत्कार
पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण

गडचिरोली, दि. ०१: नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.


नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे.


आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जाऊन एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

त्यानंतर दुपारी कोनसरी येथे, लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक, 700 रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक, 1000 रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2 हजार 700 कोटी रुपये गुंतवणूक, 1 हजार 500 रोजगार), वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक, 600 रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे समभाग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधन बचत होणार, कार्बन उर्त्सजन कमी होणार, रस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग देशातून गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून, त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशीही माहिती, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

११ जहाल नक्षलींचे समर्पण…

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. 34 वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. 3 डिव्हिजन किमिटी मेंबर तर 1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आज 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने माओवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचं काम होत असल्याचे ते म्हणाले.

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण करण्यात आले. तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले. तसेच विविध नक्षल चकमकीमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-60 च्या पोलीस जवानांचा सत्कार करण्यात आला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page