जनशक्तीचा दबाव न्यूज | नवी दिल्ली | एप्रिल १०, २०२३.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. १० जानेवारी २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण २०१४ निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली.
आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा निर्णय पक्षाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. २०१४ नंतरच्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि २०१९ नंतर २१ पैकी १२ राज्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यांमध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दूरदर्शन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यांवर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वांसाठी पक्ष अपात्र ठरतो. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा २०१९ चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
१५ दिवसांपूर्वी आम्ही आमचे म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडले होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्ही चांगले यश मिळवले. तेव्हापासून आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतरच्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी जी काही मतांची बेरीज संबंध देशभरात मिळवावी लागते, ती टक्केवारी आम्हाला मिळाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला स्पष्टीकरण मागितले होते. ते आम्ही दिले आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा तपशील घेऊन जी काही कायदेशीर पावले उचलायची ती उचलू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.