
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील समीर हुसैन हुजुरे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा बछडा आढळून आला. मानवी वस्तीत बिबट्याचा बछडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे साखरपा गोवरेवाडीत विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चिखली येथील समीर हुसैन हुजुरे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली बिबट्याचा बछडा असल्याची माहिती पोलिस पाटील रूपेश कदम यांनी देवरूखचे परिमंडळ वनअधिकारी तौफिक मुल्ला यांना माहिती दिली. यानुसार रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार यांनी त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी समवेत घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या बछड्याची पाहणी केली.
पाहणीअंती बछड्याच्या अंगावर कोणतीही जखम दिसून आली नाही. यानंतर या बछड्याला ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी देवरूख यांचे मार्फत तपासणी करून घेतल्यानंतर ते अशक्त असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे मानद वन्यजीव रक्षक रत्नागिरी श्री. निलेश बापट यांनी खात्री केली. या बछड्याला उपचारासाठी वन्यप्राणी प्राथमिक उपचार केंद्र पुणे येथे तत्काळ पाठवण्यात आले आहे. हा बछडा हा मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे २ ते ३ महिने आहे.
दरम्यान, पुढील कार्यवाही विभागीय वनअधिकारी, चिपळूण दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी, रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वनअधिकारी, देवरूख तौफिक मुल्ला करत आहेत. अशाप्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करण्याचे वनविभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.