
चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी येथे पत्नीला
समजावून घरी परत नेण्यास गेलेल्या पतीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक श्रीपत साळवी आणि गंगाराम श्रीपत साळवी (दोघे रा. मिरजोळी, ता. चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद वसंत शिंदे (४९, ता. चिपळूण) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विनोद शिंदे यांची पत्नी १० एप्रिल रोजी त्यांच्याशी भांडून दोन मुलांना घेऊन आरोपी विनायक साळवी यांच्या घरी निघून गेली होती. पत्नीला समजावून घरी आणण्यासाठी विनोद शिंदे आणि साक्षीदार संतोष दत्तात्रय भोसले हे २४ मे रोजी सायंकाळी विनायक साळवी आणि गंगाराम साळवी यांच्या मिरजोळी येथील घरी गेले. पत्नीला समजावल्यानंतर ती पतीसोबत घरी जाण्यास तयार झाली. याच कारणावरून आरोपी विनायक साळवी आणि गंगाराम साळवी यांना राग आला. त्यांनी विनोद शिंदे यांना मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. चिपळूण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.