रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या तालुक्यात १७ ग्रामपंचायतींमध्ये १८ मे २०२३ रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. सदर ग्रामपंचायत मधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या दि. ०६ एप्रिल २०२३ रोजीच्या आदेशान्वये प्राप्त झाला असून सदर कार्यक्रम कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पुढीलप्रमाणे पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत.
मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ व पालघर ग्रामपंचायत, दापोली तालुक्यात सडवे, वाकवली, खेड तालुक्यात सुकिवली, खोपी, तळवटखेड, चिपळूण तालुक्यात हडकणी व गाणे, रत्नागिरी तालुक्यात गोळप, मिऱ्या, निवळी व शिरगाव, राजापूर तालुक्यात नाटे, अणुसरे, दळे व काजिर्डा या १७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.
सदर निवडणुक कार्यक्रमानुसार मतदानाचा दिवस १८ मे २०२३ रोजी सकाळी ०७.३० वा. पासून ते सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने ग्रामपंचायतींया निवडणुका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार गुरुवार १८ मे २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या तालुक्यात उक्त पोटनिवडणुकाचा कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रापुरती मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.