
मुंबई- सध्या ‘कार्यकर्ता’ हा शब्द उच्चारला तर आपल्या नजरेसमोर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता येतो. आता तर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीलाही कार्यकर्ता म्हणतात. परंतु कार्यकर्ता या शब्दाला खूप महत्व आहे. वीर सावरकरांचे एक अतिशय सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, ‘आता आपण केवळ वसंत व्याख्यानमाला न गुंफता वसंत क्रियामाला गुंफल्या पाहिजेत.’ वीर सावरकरांनी क्रियेला, कृतीला खूप महत्व दिले आहे.
स्वतः वीर सावरकर हे कृतिशील विचारवंत होते. ‘आधी केले मग सांगितले’ उक्तीप्रमाणे वीर सावरकर वागले आहेत. ‘आज जर या देशाचे कशावाचून अडले असेल तर ते कार्यक्रमावाचून नव्हे, तर कार्यावाचून होय. वाचिवीरांचा शुष्क काथाकूट सोडून देऊन कृतिशूर व्हा.’ असा संदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशातील जनतेला दिला आहे. वीर सावरकरांना कोणतेही काम कमीपणाचे वाटले नाही. अंदमानात असताना सामान्य कैद्याने करावयाची कामे त्यांनी केली. हिंदुमहासभेच्या बैठकीचा वृतांत त्यांनी लिहिला आहे, सभांची सूचनापत्रे लिहिली आहेत.

विशेष म्हणजे ही कामे त्यांना दुय्यम वाटली नाहीत किंवा कंटाळवाणी देखील वाटली नाहीत. केवळ भाषणे देऊन नेता होणारे अनेक लोक आहेत. मात्र सावरकर हे कृतिशील नेता होते. शुद्धीकरण, संघटन, सुधारणा, भाषा-लिपी शुद्धी ही कामे त्यांनी स्वतः जातीने केली आहेत. अस्पृश्यता निवारणाचे काम करत असताना दसऱ्याच्या दिवशी अस्पृश्य व्यक्तीला घेऊन सवर्णांच्या घरी जाणे, सहभोजन अशा प्रत्यक्ष केलेल्या कामांचा व्याप खूपच मोठा आहे.

कामे करण्याच्या बाबतीत वीर सावरकरांनी केवळ मोठ्या कामांवर भर दिला नसून लहान सहान कामे करण्यावर भर दिला आहे आणि राष्ट्रालाही तोच उपदेश केला आहे. मोठी कामे करायला हरकत नाही. परंतु मोठी कामे करण्याचे बळ येईपर्यंत लहान कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ता हा कृतिशीलच हवा. तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा असला तरी त्याचे कार्याचे अंतिम ध्येय हे राष्ट्र असले पाहिजे. ‘जो सैनिक झुंजतो तो वीर, जो कार्य करतो तो कार्यकर्ता’ असे स्पष्ट मत वीर सावरकरांनी मांडले आहे.