दिवा (सचिन ठिक) हजारो लोकांचे जीव गेल्यानंतरही मुंबई गोवा हायवेचे काम रखडल्यामुळे आज कोकण प्रतिष्ठान दिवा आयोजित कोकणातील रहिवाश्यांनी दिवा स्टेशन परिसरात भव्य स्वाक्षरी मोहीम राबविली.या मोहीमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कधी ठेकेदारांच्या समस्या तर कधी जमिन अधिग्रहणामुळे तेथील शेतकऱ्यांची समस्या तर मुंबई गोवा हायवेबद्दल केंद्र सरकारची असलेली कायमचीच अनास्था यामुळे येथील दोन राज्यांना जोडणारा हा मोठा महामार्ग एक दशक पुर्ण झाले तरी बनायला तयार नाही.तसेच तो बनवायलाही येथील राज्यकर्ते आणि केंद्रशासनाची मानसिकता दिसत नाही.त्यामुळे कोकणातील नागरिकांत मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई गोवा हायवेचे काम सुरु होऊन कित्येक वर्षे झाली.जागोजागी झालेल्या खोदकामामुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन हजारो माणसे मरण पावली आहेत.परंतु याची कोणतीच पर्वा नसल्यामुळे येथील हायवेचे काम रखडलेले पहावयास मिळत आहे.एकीकडे समृद्धी महामार्ग उशिरा सुरु होऊन लवकर सुरु झाला तर दुसरीकडे लवकर सुरु झालेला मुंबई गोवा हायवे अजूनही खितपत पडलेला दिसून येत आहे.यावरुन येथील लोकप्रतिनिधींची,शासनाची मानसिकता किती दुपट्टीपणाची आहे हे दिसून येत आहे.
सध्या आता सर्वच ठिकाणी मुंबई गोवा हाय पुर्ण न झाल्याबद्दल संताप व्यक्त होत असून तो लवकर पुर्ण व्हावा आणि होणारे वारंवारचे अपघात टळावे यासाठी आज दिव्यातील कोकण प्रतिष्ठाण दिव्याच्यावतीने भव्य स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.यावेळी कोकण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.