नांदगाव परिसराच्या विकासाला मिळणार चालना
आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, लाकूड आदी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार योग्य भाव
प्रतिनिधी/कणकवली:-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड ची निर्मिती करण्याच्या आमदार नितेश राणेंच्या मागणीला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मान्य केले आहे. तर पणन विभागाच्या उपसचिवाना मार्केट यार्ड निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पणन मंत्री सत्तार यांनी दिले आहेत.
नांदगाव मध्ये मार्केट यार्ड निर्मितीबाबत आमदार नितेश राणे यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची आज भेट घेत निवेदन दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, खैर लाकूड, इमारती लाकूड यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. वरील उत्पादीत माल हा थेट मुंबई बाजारपेठेत जातो व त्यानंतर राज्याच्या इतर भागात तसेच परदेशात पाठविला जातो. यासाठी जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्डची निर्मिती झाल्यास, त्याठिकाणी लिलावगृह, शेतकरी निवास, बाजार, शितगृह, भुईकोट गोदामे, हमाल भवन, बैलबाजार यांची सुविधा स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध होईल व जिल्ह्यातील व्यापार उदीम वाढून आपल्या उत्पादनांला चांगला बाजारभाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावेल.
यासाठी शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यामधील नांदगाव येथील रेल्वे स्टेशन जवळ मार्केट यार्डची उभारणी झाल्यास सर्वांना सोईचे होईल. तरी मंजूरीच्या कार्यवाहीबाबत त्वरीत आदेश व्हावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केले आहे. त्या मागणीची दाखल घेत तातडीने प्रस्ताव तयार करण्यात यावा आणि तो आपल्या कडे पाठवावा असे आदेश केले आहे.