अॅमस्टरडॅम- नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस वेन एग्त आणि त्यांची पत्नी यूजीन यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी इच्छामरणाच्या माध्यमातून जगाचा निरोप घेतला आहे. ड्राइस आणि यूजीन यांनी नेदरलँडमधील निजमेगेन शहरात अखेरचा श्वास घेतला.
हे दोघेही दीर्घकाळापासून आजारी होते. त्यामुळे त्यांनी इच्छा मृत्यूच्या माध्यमातून प्राण सोडले. ड्राइस हे १९७७ ते १९८२ या काळामध्ये नेदरलँडचे पंतप्रधान होते. त्यांनी ज्या राइट्स ग्रुपची स्थापना केली होती. त्या ग्रुपने ड्राइस आणि यूजीन यांच्या मृत्यूची माहिती दिली. या ग्रुपने माजी पंतप्रधानांच्या मृत्यूची माहिती देताना सांगितले की, आम्ही कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर आमचे संस्थापक आणि अध्यक्ष ड्राइस वेन एग्त यांचं त्यांच्या निजमेगेन येथील निवासस्थानी निधन झाल्याची घोषणा करत आहोत.
मृत्यूवेळी या पती-पत्नीने हातात हात घेऊन जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर साधेपणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. वेन एग्त आणि त्यांची पत्नी ७० वर्षांपर्यंत एकत्र होते. नेदरलँडमध्ये सकाळी २००० मध्ये इच्छामृत्यूला कायदेशीर मान्यता मिळाली होती. गंभीर आणि असाध्य आजाराने ग्रस्त असलेली आणि प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसलेली व्यक्ती इच्छामृत्यूची मागणी करू शकते. दरम्यान, वेन एग्त आणि त्यांच्या पत्नीने सुमारे सात दशकांच्या सहजीवनानंतर मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्वत: यासाठी मृत्यूचा दिवस आणि वेळ निश्चित केली. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा तिथे डॉक्टरांचं पथक उपस्थित होतं.