
संगमेश्वर /प्रतिनिधी / दिनेश आंब्रे- श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोळंबे येथे इयत्ता ११ वीच्या नवोदित विद्यार्थ्यांचे भरभरून, मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. नव्या प्रवासाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात आणि आनंदात झाली. कॉलेजच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन पाहून हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.
शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात नवोदित विद्यार्थ्यांचे औक्षण करत त्यांना टाळ्यांच्या गजरात आनंदाने सामावून घेतले गेले. परिपाठानंतर मान्यवर, शिक्षक आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी आपुलकीने नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्वागताने भारावलेल्या इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी नम्र शब्दांत सांगितले, “आमचं स्वागत ज्या आत्मीयतेने, प्रेमाने झालं, त्यामुळे आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत.”
शिक्षकांनी प्रेमळ शब्दांत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिंदे सर म्हणाले, “आई जशी जन्मदात्री असते, तशीच आम्ही तुम्हाला इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंत मायेने जपले आहे. आता या नव्या टप्प्यावरही आम्ही तुमच्यासोबत आहोत.” खांबे सर म्हणाले, “या कॉलेजशी एकरूप होऊन विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हा! घेतलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा!”

या प्रसंगी उपस्थित पालक श्री. विठ्ठल जाधव म्हणाले, “या कॉलेजने केलेल्या मनापासूनच्या स्वागताने आम्ही भारावून गेलो आहोत. हे कॉलेज आम्हाला मनापासून आवडलं आहे. मुलांनी शिक्षकांच्या मेहनतीला साथ द्यावी, हेच आमचं अपेक्षित आहे.” त्यांच्या शब्दांमध्ये विश्वास, समाधान आणि एक पालक म्हणून आलेली जाणीव स्पष्ट दिसून येत होती.
मुख्याध्यापक रवींद्र वासुदेव मुळये सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले, “१२ वी मध्ये आपल्या कॉलेजचा विद्यार्थी तालुक्यात प्रथम यावा, हा निश्चय ठेवा. शिस्त, अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर हे नक्की शक्य आहे.”
कार्यक्रमाच्या सांगतेसाठी सर्वांना गोडधोड खाऊ वाटण्यात आला. या स्वागत सोहळ्याने नव्या पर्वाची सुरुवात एका उत्साही, प्रेरणादायी आणि प्रेमळ वातावरणात केली. विद्यार्थ्यांच्या जीवनात हा दिवस एक सुंदर वळण घेणारा क्षण ठरला.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर