
*रत्नागिरी :* रस्ता ओलांडणाऱ्या वासराला बेदरकारपणे डंपर चालवून गाडीची ठोकर देत दुखापत केली. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार १० जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याबाबत पोलीस हवालदार उदय बांदल (३९) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ते डायल ११२ वाहनातून ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तेव्हा सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांना हातखंबा ते रत्नागिरी जात असलेल्या एका अज्ञात डंपरने रस्ता ओलांडणाऱ्या वासराला ठोकर देत अपघात केल्याचे निदर्शनास आले. यात वासराच्या उजव्या पायाच्या खुराजवळ दुखापत झाली. या अपघातानंतर डंपर चालकाने न थांबता तिथून पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.