नवी दिल्ली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत.आज ते नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून राज्याचे मुद्दे या बैठकीत मांडणार आहेत.आज या बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न या बैठकीत प्रामुख्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचे असून यापूर्वी देखील राज्यपालांना डावलून अनेक राज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या पूर्व पंतप्रधानांच्या हस्ते ग्रंथालयाच्या इमारतींचे उद्घाटन झालेली आहेत. फक्त मोदींना विरोध करायचा म्हणून या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.ते सर्वस्वी चुकीचे आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
देशातील भाजप विरोधी पक्षांनी संसदेचे उद्धाटन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी भूमिका घेत संसदेच्या उद्धाटनावर बहिष्कार टाकला आहे.यात विशेषत: राष्ट्रीय कॉग्रेस,शिवसेना (उद्धव बाळासाहेब
ठाकरे),राष्ट्रवादी, आप, तृणमुल कॉग्रेस अशा विविध पक्षांनी या उद्धाटनावर बहिष्कार टाकला आहे.