धुळे – धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने सर्वसामान्य धुळेकर नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. याचाच एक परिणाम म्हणून भर उन्हात आज धुळे महानगर पालिकेच्या गेटवर जुने धुळे भागात राहणाऱ्या सुनील ताडगे यांनी अंघोळ करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाई ही धुळेकरांच्या नशिबात कायमच असते. उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याचे नियोजन करण्याबाबत वारंवार मागणी केली जाते, मात्र तरी देखील धुळे महानगर पालिकेकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे ऐन उन्हाळ्यात धुळेकर नागरिकांना १० ते १२ दिवसाआड तर काही भागात तब्बल १५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. याच पाणी पुरवठ्याच्या संदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलन करीत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते.
धुळे शहरातील जुने धुळे भागात राहणाऱ्या सुनील ताडगे यांच्या चुलत भावाचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून त्यांच्या घरी बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांची मोठी गर्दी आहे. त्यातच धुळे शहरात असलेल्या पाणीटंचाईमुळे आलेल्या पाहुण्यांना वापरण्याकरिता व पिण्याकरिता पाणीच नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सुनील ताडगे यांनी धुळे महापालिकेच्या गेटवरच अंघोळ करीत दहा ते बारा दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत धुळे मनपाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
एकीकडे धुळे महानगर पालिका अक्कलपाडा योजनेतून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत फक्त आश्वासन देत असून दुसरीकडे मात्र नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावात फक्त धुळे शहराला ९० पेक्षा कमी दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक असून यामुळे नागरिकांना पाऊस वेळेवर न झाल्यास आणखीन तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आज सुनील ताडगे या सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर तरी धुळे महानगर पालिका प्रशासन पाणीपुरवठा बाबत काही ठोस भूमिका घेते का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.