भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
*पल्लेकेले :* भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना जिंकून भारतीय संघ सध्या या मालिकेत 1-0 नं पुढं आहे.
*शुभमन गिलच्या ऐवजी संजूला संधी-*
भारतीय संघानं पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा सामना जिंकून टी-20 मालिका जिंकायची आहे. सूर्यानं प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. उपकर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिलला वगळण्यात आलं आहे. तो जखमी झाला आहे. गिलच्या जागी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असालंकानंही बदल केला. दिलशान मधुशंकाच्या जागी रमेश मेंडिसचा संघात समावेश केला आहे.
*श्रीलंकेविरुद्ध भारताचा वरचष्मा-*
एकमेकांविरुद्धच्या विक्रमांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा आहे. पण श्रीलंकेला अजिबात हलक्यात घेता येणार नाही. आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात 30 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात भारतानं 20 सामने जिंकले, तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला.
*भारतीय संघ :* यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रायन पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.
*श्रीलंकेचा संघ :* पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस.