
*चिपळूण :* अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचा स्थानिक पदाधिकारी असलेल्या तरुणावर पोस्को (POCSO) कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम (रा. कापसाळ, ता. चिपळूण) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत संशयिताने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पीडितेने चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पोस्को कायदा व भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, आरोपी भाजपचा पदाधिकारी असल्याची नोंद/ओळख समोर आली असून, अटकेनंतर त्याच्या मोबाईल तपासणीत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो व संपर्क आढळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच आरोपीकडे संशयास्पद पदार्थ आढळल्याचा मुद्दा तपासाधीन असून, त्याबाबत स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबींवर तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत असून, पीडितेला आवश्यक ती वैद्यकीय, मानसोपचार व कायदेशीर मदत पुरवण्यात येत आहे. पोस्को कायद्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीची ओळख उघड करणे दंडनीय असल्याने नागरिकांनी अफवा पसरवू नयेत व तपासात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*