महिलेला मारहाण ; दीर आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल…

Spread the love

*लांजा :*  किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी देत कोयतीने महिलेच्या हाताला दुखापत केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी महिलेचा दीर आणि सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
       

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लांजा तालुक्यातील कोर्ले मुस्लीम वाडी येथे दिनांक ६ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली .  याबाबतची फिर्याद आयशा दिलदार थोडगे (वय ३०, राहणार कोर्ले मुस्लीम वाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. आयशा थोडगे व त्यांचे नात्याने दीर असलेले मुबारक इब्राहिम थोडगे (वय ४५) आणि सासरे इब्राहिम युनुस थोडगे (वय ७०) हे एकाच घरात विभक्त राहतात. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वादविवाद आहेत. दिनांक ६ जून रोजी आयशा थोडगे यांचे पती दिलदार इब्राहिम थोडगे हे चिपळूणवरून आपल्या घरी आले होते आणि त्यानंतर त्यांनी आपली कार घरासमोर पार्क केली होती. त्यावेळी मुबारक थोडगे आणि इब्राहिम थोडगे या पिता-पुत्रांनी दिलदार थोडगे यांना तू इथे गाडी लावायची नाहीस. तुझे इथे काहीही नाही असे सांगितले. मात्र दिलदार थोडगे यांनी गाडी इथेच लावणार, असे सांगितले. याचा राग घेऊन मुबारक व इब्राहिम हे त्यांच्या कारच्या काचेवर हात मारून शिवीगाळ करू लागले. याच दरम्यान आयशा या घराच्या बाहेर आल्या. त्यावेळी त्या दोघांनी त्यांना देखील शिवीगाळ केली तर मुबारक थोडगे याने आयशा यांना नारळाच्या झापाने मारून, शिवीगाळ केली. तसेच तू इकडे ये तुला खल्लास करतो. तू सर्व भांडणाचे कारण आहेस. तुला कोयतीने कापून टाकतो अशी धमकी दिली. तसेच घरातून कोयती घेऊन तो आयशा यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी आयशा यांनी बचावासाठी हातमध्ये घातला असता कोयतीने त्यांच्या एका हाताच्या मधल्या बोटाला व उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूच्या बोटाला लागून दुखापत झाली.
     

याप्रकरणी आयशा थोडगे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, लांजा पोलिसांनी आयशा यांचा दीर मुबारक थोडगे आणि सासरा इब्राहिम थोडगे या दोघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ३५२, ३५१(२) ,१३१, ३ (५) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार भालचंद्र रेवणे हे करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page